मुख्याध्यापकांचे मनोगत

सस्नेह नमस्कार

रत्नागिरीच्या शैक्षणिक वाटचालीत आपले नाव अधोरेखित करणा-या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा. भा. शिर्के प्रशाला ही कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणा-या या प्रशालेच्या प्रांगणात बालवर्गापासून १२ वी पर्यंत सुमारे २५०० विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

सन १९४८ साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने टयुटोरियल स्कूल चालविण्यास ताब्यात घेतले. त्यावेळी कै.रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून टयुटोरियल स्कूलचे नामकरण रा.भा.शिर्के प्रशाला असे करण्यात आले. आज शाळेने सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवल्याचे आपण अनुभवत आहोत. याचे सर्व श्रेय प्रशालेचे सन्माननीय संस्थापक, आजवरचे सर्व पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जागरुक पालक, उदार देणगीदार, गुणवंत विदयार्थी हितचिंतक या सर्वांना जाते.

शालेय, शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने मिळणारे सुयश हे प्रशालेचे आणखी एक प्रमुख वैशिष्टय. इ.१०वी च्या बोर्ड परीक्षेत सतत ९०% च्या वर निकाल आणि बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये झळकणारे विदयार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेत, एन.एम.एम.एस.परीक्षेत मोठया संख्येने गुणवत्ता यादीत स्थान पटकावणारे विदयार्थी, याशिवाय डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, ऑलिम्पियाड, गणित प्रज्ञा शोध परीक्षा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमधील यश ही शाळेची परंपराच आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणारा विद्यार्थी याच प्रशालेचा. तसेच इ.१०वी च्या बोर्डाच्या परीक्षेत तीन भाषा विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम येऊन एक लाख रुपयांचे नीळकंठ खाडिलकर पारितोषिक मिळविण्याचा इतिहास याच प्रशालेतील विदयार्थ्याने रचला आहे.

साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियानात कोल्हापूर विभागात पहिल्याच वर्षी सर्वप्रथम आणि रत्नागिरी जिल्ह्यात सतत तीन वर्षे शाळा प्रथम आली आहे या सर्वांचे उत्तम उदाहरण आहे.

सुसज्ज प्रयोगशाळा, ड्रॉईंग रुम, कॉम्प्युटर रुम, आय.सी.टी.प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय आणि सौ. विजयालक्ष्मी मलुष्टे रंजन मंदिर, प्रशस्त असे कै.भाऊसाहेब देसाई क्रीडांगण, तंत्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन इ.९वी-१०वीतील विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल विषय घेण्याची व्यवस्था ही प्रशालेची खास वैशिष्टये आहेत.

क्रीडा क्षेत्रात शाळेने कायम वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शाळेच्या प्रशस्त क्रीडांगणावर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. प्रशालेच्या दोन विदयार्थिनी शिवछत्रपती क्रीडापुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. जानकी पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देखील क्रीडापटूंनी मिळविले आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत रौप्यपदकांची कमाईदेखील विदयार्थिनींनी केली आहे.

दिल्ली येथे होणा-या आर.डी.परेडसाठी सलग दोन वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य प्रशालेला लाभले आहे.

ॲड.बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्प हे शाळेचे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पाऊल. डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, सी.ए., वकील, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, गायक, वादक, नृत्यांगना, अभिनेते पासून नासासारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून देखील प्रशालेचे विद्यार्थी कार्यरत आहेत. असे विविध क्षेत्रात कार्य करणारे अनेक उत्तमोत्तम यशवंत विद्यार्थी शाळेने घडविले आहेत. अनेक विद्यार्थी देश-विदेशातही उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही गौरवास्पद गोष्ट आहे. या सर्वांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

१९४८ च्या इवल्याशा रोपटयाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आता तंत्रज्ञान युगाकडे वाटचाल करताना, बदलत्या काळाला सामोरे जाण्यासाठी अजुनही विविधांगांनी शाळेला सुसज्ज करण्यासाठी आपण सर्वांनीच सज्ज होऊ या.

चला तर मग या ज्ञानयज्ञात आपलीही 'समिधा' अर्पण करण्यासाठी एकत्र येऊ या.