प्रशालेचे विविध विभाग

  • बाह्य परीक्षा
    competative-exam

    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) - ह्या परीक्षांचे आयोजन ‘ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ’ यांचेमार्फत करण्यात येते. ही शासकीय स्वरूपाची परीक्षा असून इ.५वी व इ.८वी तील विद्यार्थ्यांना या परीक्षांकरिता बसविण्यात येते. प्रत्येक विषयासाठी प्रशालेतून अतिरिक्त (जादा) तासिकांचे नियोजन करून यानुसार नियमितपणे मार्गदर्शन करण्यात येते.

    डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा मुंबई विज्ञान शिक्षक मंडळामार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही खाजगी स्वरूपाची परीक्षा असून इ.६वी आणि ९वी करिता घेण्यात येते. विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन संशोधक वृत्ती वाढविणे हा या परीक्षेमागील मुख्य हेतू आहे. लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व तोंडी परीक्षा अशा चार टप्प्यात ही परीक्षा घेतली जाते. ऐच्छिक स्वरूपाची परीक्षा असून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना विभागामार्फत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यात येते.

    SOF Examination SCIENCE OLYMPIAD FOUNDATION मार्फत इ.५वी ते इ.१०वी करिता NSO, IMO, IEO इ. परीक्षांचे आयोजन करण्यात येते. ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरुपाची परीक्षा आहे. या मध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, कम्प्युटर आणि सामान्य ज्ञान इ. विषयांचे पेपर येतात. यासाठी प्रशालेमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.

    BDS परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्व तयारी होण्याकरिता इ.५वी व इ.८वी करिता ह्या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही खाजगी स्वरूपाची परीक्षा असून या परीक्षेमधून स्पर्धा परीक्षेची तयारी होण्याकरता मदत होते. विद्यार्थ्यांना जादा मार्गदर्शन करण्यासाठी जादा तासिकांचे नियोजन करण्यात येते.

    NMMS परीक्षा शासनामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. इ.८वी साठी ही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून ज्या पालकांचे वार्षिक उत्पन रु. एक लाख पन्नास हजार पर्यंत आहे अशा पालकांचे पाल्य या परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ शकतात. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना इ.९वी ते इ.१२वी पर्यंत केंद्र सरकारची रु.१२०००/- प्रतिवर्षी शिष्यवृत्ती प्राप्त होते. या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार स्वतंत्र जादा तासिकांचे वेळापत्रक बनवून जादा मार्गदर्शन करण्यात येते. या परीक्षेसाठी मानसिक क्षमता कसोटी (बुद्धिमता) गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे हे विषय असतात.

  • Garib-Vidyarthi-Nidhi

    रा.भा.शिर्के प्रशालेच्या इतिहासात नियमितपणे वर्षभर चालू असलेला आणि सलग ५६ वर्षे कार्यरत असलेला विभाग म्हणजे गरीब विद्यार्थी निधी विभाग होय.

    प्रशालेत शिकणाऱ्या परिस्थितीने गरीब; परंतु हुशार, होतकरु विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या प्रगतीस हातभार लावला जातो. वह्या, पुस्तके, गणवेश, कंपासपेटी, ST बस पास शुल्क, SSC बोर्ड परीक्षा शुल्क आणि शालेय परीक्षा शुल्क अशा विविध माध्यमातून ही मदत करण्यात येते. प्रतिवर्षी सुमारे शंभर विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात.

    या निधीसाठी विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त यथाशक्ती मदत करतात. शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक हेही त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी देणग्या देतात.

    आजवर हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला या विभागातर्फे हातभार लावण्यात आला आहे. हेच विद्यार्थी त्यांच्या नंतरच्या यशस्वी करियरमध्ये आठवणीने या निधीत सातत्याने देणग्या देऊन भर घालीत आहेत.

  • Science-Dept

    प्रशालेच्या विज्ञान विभागामार्फत खालील उपक्रम राबविण्यात येतात व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याची संधी दिली जाते.

    १. शासकिय विज्ञान प्रदर्शने
    २. शासकिय विज्ञान मेळावा
    ३. विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा
    ४. शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन
    ५. वैज्ञानिक नाटिका
    ६. शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान विषयक प्रभातफेऱ्या
    ७. तालुका–जिल्हा-राज्य- राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभाग
    ८. AWIM (A WORLD IN MOTION) महिंद्रा अँड महिंद्रामार्फत घेण्यात येणारे प्रदर्शन व स्पर्धा
    ९. FINOLEX मार्फत घेण्यात येणारे विज्ञान प्रदर्शन इ.अशा विविध उपक्रमात प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक भाग घेत असतात.

    आजपर्यंत तालुका स्तरावर (शासनामार्फत आयोजित केले जाणारे) विज्ञान प्रदर्शनात प्रशालेची १२ वेळा निवड झाली, जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात ०८ वेळा निवड झाली व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ०२ वेळा निवड झाली आहे.

  • Science-Lab

    प्रशालेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र असे तीन स्वतंत्र विभाग असलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये इ.5वी ते इ.12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रयोगाचे मार्गदर्शन व दिग्दर्शन केले जाते.

    प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, वैज्ञानिक VIDEOS दाखवण्यासाठी LCD स्क्रीन, प्रोजेक्टर, स्पिकर, अ‍ॅम्प्लीफायर इ.साधने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रयोग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

    विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, त्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळावा ह्या दृष्टीने प्रयोगशाळेत दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शालेय विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. ज्यामध्ये शाळेतील इ.५वी ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात.

  • inspire-manak

    केंद्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ‘इन्स्पायर ॲवॉर्ड मानक’ या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होतात. नावीन्यपूर्ण संकल्पना विद्यार्थी मांडतात व त्यातील उत्कृष्ठ संकल्पनांची शासनामार्फत निवड केली जाते. अशा निवडक विद्यार्थ्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त होते. या रकमेतून विद्यार्थी नावीन्यपूर्ण, समाज उपयोगी अशा वैज्ञानिक साहित्य प्रतिकृती तयार करतात.

    सदर स्पर्धेत इ.६वी ते इ.१० वीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. शालेयस्तरावर IDEA COMPETITION घेण्यात येऊन त्यातील निवडक विद्यार्थ्यांचे INSPIRE AWARD MANAK ह्या स्पर्धेसाठी नामांकन करण्यात येते.

  • ATAL-Tinkering-lab

    देशाच्या सर्व भागांमध्ये नवनवीन वैज्ञानिक संकल्पना आणि उद्योजकतेचा प्रसार करण्यासाठी भारत सरकारने नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोवेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाची स्थापना केली आहे.

    AIM या संस्थेमार्फत र.ए.सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेला अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाली आहे. AIM या संस्थेच्या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांसाठी ELECTRONICS DEVELOPMENT, ROBOTICS, INTERNET, MECHANICAL, SPACE SCIENCE, 3D PRINTING या क्षेत्रांचे मार्गदर्शन केले जाते. ATAL LAB अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते AIM या संस्थेमार्फत र.ए.सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेला अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाली आहे. AIM या संस्थेच्या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांसाठी ELECTRONICS DEVELOPMENT, ROBOTICS, INTERNET, MECHANICAL, SPACE SCIENCE, 3D PRINTING या क्षेत्रांचे मार्गदर्शन केले जाते. ATAL LAB अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते व अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर प्रशालेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध उपकरणांची निर्मिती करतात व विविध स्पर्धामध्ये सहभागी होतात.

  • Library

    प्रशालेचे ग्रंथालय विविध प्रकारच्या ग्रंथांनी समृध्द आहे. अनेक प्रकारचे संदर्भ ग्रंथ यामध्ये मराठी विश्वकोष (सर्वखंड), संस्कृतीकोश, शिल्पकार, चित्रकोश, लीलावती, तुकाराम गाथा, कुमार विश्वकोश, जागतिक वैज्ञानिक कोश, चिल्ड्रेन्स एन्सायक्लोपिडीया, पु.ल.देशपांडे यांची भरपूर पुस्तके, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा व इतर अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके, वैज्ञानिक ग्रंथ, चित्रकला, नाटक, प्रवास वर्णन, ऐतिहासिक पुस्तके, इंग्रजी, हिंदी अशी सर्व प्रकारची पुस्तके व विपुल असे बालवाडःमयाने ग्रंथालय समृध्द आहे.

    ग्रंथालयात एकूण १३५०० पुस्तके आहेत. विद्यार्थी ग्रंथालयाचा लाभ उत्तम प्रकारे घेतात. दरवर्षी जास्त पुस्तके वाचणा-या विद्यार्थ्यांसाठी 'कै.चंद्राबाई गीते वाचक पुरस्कार' दिला जातो.

    दरवर्षी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन दि.१५ऑक्टोबर रोजी 'वाचन प्रेरणा दिन' विविध उपक्रमानी साजरा केला जातो. दरवर्षी २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. संस्कृत दिनानिमित्त संस्कृत ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले जाते.

  • Carrier-Guidence

    प्रशालेत अनेक वर्षांपासून व्यवसाय मार्गदर्शन विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी विविध करियर, अभ्यासशाखा, स्पर्धा परीक्षा व शिष्यवृती इत्यादी विषयांची माहिती देण्यात येते.

    विविध क्षेत्रातील यशस्वी तसेच तज्ज्ञ व्यक्तींना प्रशालेत मार्गदर्शक म्हणून बोलाविण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. या विभागांतर्गत क्षेत्र भेट तसेच कल चाचणीचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याना व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत विविध उपक्रमांसाठी प्रशालेत आवर्जून निमंत्रित करण्यात येते. व्यवसाय सर्वेक्षण आणि मुलाखत या प्रकल्पांतर्गत अनेक विद्यार्थी माहिती संकलन आणि विश्लेषण हे उपक्रम हाती घेतात. ONLINE व OFFLINE या दोन्ही माध्यमातून या विभागाचे काम चालते.

  • Drawing-room

    कलादालन- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कला विषयाच्या अध्यापनात कलादालनाची उपयुक्तता ओळखून संस्थेमार्फत स्वतंत्र कला वर्गाची निर्मिती करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र शासन कला संचालनालयामार्फत घेतली जाणारी चित्रकला ग्रेड परीक्षा प्रशालेतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होतात. एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेच्या उत्तम निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. A श्रेणी व B श्रेणी धारक विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात असते. या परीक्षेसाठी इ.८वी-इ.९वी मधील विद्यार्थी प्रविष्ठ होतात. या विद्यार्थ्यांसाठी शालेय वेळापत्रकातील तासिकांव्यतिरिक्त ज्यादा तासिका घेऊन मार्गदर्शन केले जाते .

    शासकीय चित्रकला स्पर्धेबरोबर सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या चित्रकला, मूर्तिकला, पोस्टर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी प्रशालेतर्फे देण्यात येते.

    प्रशालेतर्फे दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन कालावधीत विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामाचे (चित्रांचे) प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन त्याच बरोबर कार्यानुभव अंतर्गत टाकाऊपासून टिकाऊ हस्तकला प्रदर्शन भरवण्यात येते.

  • Scout-Guide

    प्रशालेचा क्रीडा विभाग विविध क्रीडा साहित्याने परिपूर्ण असून विद्यार्थ्यांना खालील क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. सदर क्रीडा प्रकारांसाठी प्रशालेतील तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

    १. क्रीडा प्रकार – खो-खो, क्रिकेट, बास्केटबॉल, फुट्बॉल, व्हॉलीबॉल, चेस, कराटे, तायक्वॉन्दो, कॅरम, अ‍ॅथलेटिक्स, तलवारबाजी, धनुर्विद्या, स्विमिंग, ज्युडो इ.
    २. उपक्रम:- खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, चेस, कॅरम, कराटे, तायक्वॉन्दो इ. खेळांची शिबिरे आयोजित केली जातात. विविध खेळांची ऑनलाईन / ऑफलाईन आणि प्रात्यक्षिकाद्वारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते. प्रशालेच्या विस्तीर्ण पटांगणावर तसेच छ.शिवाजी महाराज स्टेडियम येथे विविध खेळांचा सराव नियमितपणे करुन घेण्यात येतो.
    ३. क्रीडांगण माहिती :- शाळेला दर्शनी भागाकडे ४० मीटर X ८० मीटर क्रीडांगण लाभले आहे, तर शाळेच्या इमारतीच्या मागे ३० मीटर X १८ मीटर आकाराचे बास्केटबॉल बॉल मैदान आहे. यात अनेक खेळांचा सराव केला जातो.
    ४. शाळेची उल्लेखनिय कामगिरी:-
    १. रत्नागिरी जिल्ह्यात खेळात सर्वाधिक गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम (सलग १५ वर्षे) शासनाचे प्रोत्साहनात्मक क्रीडा अनुदान प्राप्त झाले आहे .
    २. जिल्हास्तरीय खेळाडू : ३५०० (विविध क्रीडा प्रकारात)
    ३. तालुकास्तरीय खेळाडू : २००० (विविध क्रीडा प्रकारात )
    ४. राज्यस्तरीय खेळाडू : १५०० (विविध क्रीडा प्रकारात )
    ५. राष्ट्रीयस्तर खेळाडू : १२० (विविध क्रीडा प्रकारात )
    ६. आंतरराष्ट्रीय खेळाडू : ०५ (खो-खो, क्रिकेट, योगासने, कॅरम)

    अनेक माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक खेळांकरिता गणवेश, क्रीडा साहित्य, स्पर्धेकरिता प्रवास खर्च, नाश्ता व भोजन खर्च या स्वरूपात मदत करतात.

  • Competition-Dept

    प्रशालेचा अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे स्पर्धा विभाग. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत स्पर्धा विभाग कार्यरत आहे. विद्यार्थी राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व शालेयस्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करतात आणि शाळेला गौरव प्राप्त करून देतात.

    स्पर्धांचे स्वरूप - वक्तृत्व स्पर्धा, निबंधस्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, घोषवाक्य तयार करणे स्पर्धा, किल्ला बनविणे स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पठण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, पोस्टर्स तयार करणे स्पर्धा अशा विविध स्पर्धा विभागामार्फत घेण्यात येतात.

  • Scout-Guide

    प्रशालेत अनेक वर्षे स्काऊट गाईड विभाग कार्यरत आहे. दरवर्षी स्काऊट गाईड कार्यालयामार्फत जिल्हा व तालुकास्तरीय शिबीर भरवण्यात येते. अनेक EVENTS या शिबिरामध्ये आयोजित केले जातात. यामध्ये प्रशालेचे स्काऊट गाईड्स अव्वल कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी करतात. यातून विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी बनवले जाते.

    प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी (स्काउट / गाईड) राज्य पुरस्कार परीक्षेला बसून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत प्रशालेला सन्मानाची पंतप्रधान ढाल आणि राष्ट्रपती पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे तसेच आत्तापर्यंत प्रशालेतील ३७ विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रशालेतील स्काऊटर गाईडर यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळेच हे शक्य होत आहे. रत्नागिरी जिल्हा स्काऊट गाईड संस्थेचे सचिव म्हणून प्रशालेतील शिक्षकांनी सलग पंधरा वर्षे नेतृत्व करून भरीव कार्य केले आहे. अनेक शिक्षकांनी या संस्थेच्या अनेक पदांवर कार्य केले आहे.